कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे – पालकमंत्री शिंगणे

बुलडाणा प्रतिनिधी । राज्यात मागील एक ते दीड वर्षापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. या दरम्यान दोन संसर्गाच्या लाटा अनुभवली असून पुढे भविष्यात आणखी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले.

कोरोना संसर्ग नियत्रंण आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आढावा घेतांना पालकमंत्री डॉ शिंगणे बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ नितीन तडस, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, सहायक आयुक्त बोर्डे आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यात निर्माणाधीन असणारे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकर पूर्ण करून कार्यान्वित करण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकर कार्यान्वित करावे. जिल्हा प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्ण करावा. कुठल्याही आपद कालीन परिस्थितीत प्राणवायू ची कमतरता पडायला नको.

 

ते पुढे म्हणाले, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. कोरोना सोबतच अन्य साथ रोग नियंत्रणा कडे लक्ष द्यावे. दूषित पाण्यामुळे साथ रोग पसरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. संबधित विभागाने याबाबत सर्वेक्षण करून साथ रोग नियत्रंण करावे. कोरोना चा तिसऱ्या लाटेत संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग सुरक्षेचे नियम काटेकोर पणे पाळावे. कोरोनापासून वाचविण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुवावे किंवा सॅनीटाईज करावे, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. या त्रिसूत्री चा उपयोग करावा. कोरोना गेला असे समजून वागू नका, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले. याप्रसंगी संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content