मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाने सप्टेंबर महिनाभर मुदतवाढ दिली आहे. मात्र यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फत भरलेले अर्जच स्वीकारण्यात येतील, असा जीआर महिला व बालकल्याण विभागाने शुक्रवारी काढला आहे. अर्जांची संख्या कमी झाल्यामुळे हा बदल केल्याचे निर्णयात म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात वेगवेगळ्या यंत्रणेकडून अर्ज भरताना निकष पाळले जात नसल्याचे लक्षात आल्याने शासनाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी शहरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र आता या सर्वांचे अधिकार काढून आता अंगणवाडी सेविकांना दिले आहेत. सुुरुवातीच्या काळात बहुतांश महिलांनी स्वत:च्या लॉगइनवरून अर्ज भरले होते. आता तेही अधिकार राहिलेले नाहीत.
बँक खात्यात मिनिमम बॅलन्स किंवा थकीत कर्जामुळे पैसे खात्यातून कपात झाले तर घाबरू नये, त्यासाठी तालुकास्तरावर हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले आहेत. बँकेतून पैसे कधीही काढता येतील, त्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
पात्र लाभार्थींपैकी ४० टक्के महिलांच्या खात्यांची ई-केवायसी नसल्याने त्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांंनी बँक खात्याला तातडीने आधार सीडिंग करून घ्यावे, त्यामुळे जलदगतीने खात्यात पैसे जमा होईल. या योजनेत इतर कुणाचीही मदत न घेता नारीशक्ती दूत अॅपमार्फत महिलांना थेट अर्ज करता येतात. मात्र नव्या परिपत्रकात या अॅपवरून येणाऱ्या अर्जांच्या ग्राह्यतेविषयी काहीही म्हटलेले नाही. त्यामुळे या अॅपवरील अर्ज स्वीकारले जातील, असे म्हटले जात आहे. या अॅपबाबत सुरुवातीच्या काळात अनेक तक्रारी आल्या होत्या.