जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संपूर्ण राज्यात महिलांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांसाठी एस टी प्रवासात सवलत आणि आता मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना, यामुळे महिलांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यासर्व योजनाच्या बाबतीत बहिणींशी सुसंवाद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्ह्यातील खासदार, आमदार हे सर्वजण उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम मंगळवारी दुपारी 2.30 वाजता सागर पार्कवर होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
सागर पार्कवर होणार असलेल्या कार्यक्रमाची तयारी सुरु असून त्याची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला जवळपास 40 हजार बहिणीसह इतर जिल्ह्यातील लोकं, सरपंच उपस्थित राहतील. त्या दृष्टीने तयार करण्यात आल्याची माहिती दिली. शहरात विविध तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात दत्त मंदिर ते सिंध कॉलनी रोड, डी मार्ट ते काव्य रत्नावली चौक, खान्देश मॉल पार्किंग, जी. एस. मैदान अशा पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम स्थळी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.