किराणा दुकान फोडून मुद्देमाल लांबविला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील गेंदालाल मिल परिसरातील वासुदेव किरणा दुकानाचे शटर उचकावून २२ हजार ४९० रूपयांचा मुद्देमालाची चोरी केल्याची घटना गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, वासुदेव टिकूमल हनंदी (वय-५९) रा. कवर नगर, सिंधी कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे गेंदालाल मिल परिसरात वासुदेव किरणा दुकान असून दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता किराणा दुकान बंद करून ते घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर कशानेतरी उचकावून आत प्रवेश करत २२ हजार ४९० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकारी दुसऱ्या दिवशी गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. त्यानुसार वासुदेव हनंदी यांनी चोरी झाल्याबाबत जळगाव शहर पोलीसांना कळविले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर सकाळी ११ वाजता वासुदेव हनंदी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे.

Protected Content