घरकुल घोटाळा : दिग्गजांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त

dada appa

जळगाव, प्रतिनिधी | घरकुल घोटाळ्याचा ऐतिहासिक निकाल आज (दि.३१) जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील तीन दिग्गज नेत्यांसह अनेक स्थानिक नेत्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त झाले आहे. येत्या महिनाभरात बिगुल वाजणार असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या माजीमंत्री सुरेशदादा जैन व गुलाबराव देवकर यांच्यासह चोपड्याचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांना ही निवडणूक लढवणे आता अशक्य होणार आहे.

 

या प्रकरणात त्यांना शिक्षा झाल्याने त्यांना कायद्यानुसार निवडणूक लढण्याला परवानगी मिळणार नाही. जरी त्यांनी वरच्या न्यायालयात अपील केले आणि तिथे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला तरी खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागत नाही किंवा ते आपली शिक्षा भोगून पुन्हा मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना आता निवडणूक लढता येणे शक्य होणार नाही. तसेच ही सगळी न्यायालयीन लढाई एवढ्या कमी कालावधीत पार पडणे मुळीच शक्य नाही. त्यामुळे अनिश्चित काळासाठी आता त्यांच्या राजकीय करिअरला ब्रेक लागला आहे.

थोड्याफार फरकाने हीच कथा त्यांच्यासोबत या खटल्यात दोषी ठरलेल्या मनपातील इतर स्थानिक लोकप्रतिनिधींचीही आहे. त्यांच्याही निवडणूक लढण्यात याच कारणाने अडचणी येणार आहेत. मनपाची निवडणूक आता जवळच जरी नसली तरी खटल्याचे गांभीर्य, त्याची व्याप्ती आणि झालेली शिक्षा बघता वरच्या न्यायालयात त्याची वेळेत सुनावणी होवून या सगळ्यांच्या बाजूने सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता खूप धूसर आहे. त्यामुळे त्यांच्याही राजकीय जीवनाला एकप्रकारे पूर्णविराम लागण्याचीच शक्यता आहे.

Protected Content