जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली

 

जळगाव,प्रतिनिधी । जिल्हा परिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा अध्यक्ष रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण, चाळीसगाव तालुक्यातील घरकुल यादी व रावेर पंचायत समितीचे रिक्त पदे, भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील ग्रामसेविकेची खोटी वैद्यकीय प्रमाणपत्र आदी विषय गजलेत.

या ऑनलाईन सभेत उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील, कृषी सभापती उज्जवला म्हाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्यासह सदस्य, अधिकारी, सभापती उपस्थित होते.

या सभेत जिल्हा परिषदेचा जमा खर्चाचा अर्थसंकल्पवर चर्चा करण्यात आली. यात कोरोनामुळे शासनाकडून ५० टक्के निधी कपात करण्यात आल्याने ५० टक्के निधीचे नियोजन करावे लागणार असल्याचे पोपट तात्या भोळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत अध्यक्ष रंजना पाटील यांनी नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली. यावर सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे अध्यक्ष पाटील यांनी सदस्यांना आश्वस्त केले.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत त्रिस्तरीय योजनेतील हातपंप देखभाल दुरुस्ती निधीतील कर्मचा-यांना निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन मान्यता देण्यासंदर्भात जि .प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर सभेत सदस्यांमध्ये मतभिन्नता दिसून आली. आमचेविषयी ऐकायचे नसेल विषय अजेंड्यावर का ठेवला ? असा संतप्त सवाल नानाभाऊ यांनी उपस्थित केला. यावर नंदकिशोर महाजन यांनी, भाऊ कोविड साथ चालू आहे असा मर्म विनोद करीत सभेचे वातावरण खेळीमेळीचे केले.  ग्रामपंचायतीवर प्रशासक बसत असल्याने तसेच जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागात प्रशासक बसवा अन्यथा वसुली मोहीम जोरात राबवा असा प्रश्न मधुकर काटे यांनी विचारला असता नंदकिशोर महाजन यांनी त्यांना सहमती दर्शविली.

ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे लसीकरण मोहीम सुरु आहे काय ? असा प्रश्न मधुकर काटे यांनी विचारला असता त्यावर पशुसंवर्धन अधिकारी अविनाश इंगळे यांनी याबाबत लसीकरण साठाची मागणी करावी लागेल असे उत्तर दिले. पोपट तात्या भोळे यांनी चाळीसगाव तालुक्यात घरकुलाच्या याद्या किती मंजूर व किती अपात्र झाल्या त्यासंदर्भात सदस्यांना माहिती नाही अशी कैफियत मांडत यासाठी काय निकष लावले आहेत अशी विचारणा केली.

तसेच भोळे यांनी ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरोघरी नळ कनेक्शन दिले जात आहे. त्याबाबत प्रशासनाकडून सदस्यांना माहिती देण्यात यावी अशी सूचना मांडली . त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी जलजीवन योजना असून शासनामार्फत प्रत्येक गावात नळ कनेक्शन व पाणी पुरवठा संदर्भात हि योजना पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन असल्याची अशी माहिती दिली.

१५ व्या वित्त आयोगाअंतर्गत विविध कामांची ऑर्डर निघाली नाही का असा प्रश्न सदस्य सरोजिनी गरुड यांनी उपस्थित करत याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली. त्यावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद येवले यांनी या सभेत प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर आता कामाची ऑर्डर निघेल असे सांगितले. जिल्ह्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतीतील रस्ते खराब झाले आहे. एमआरजीएस अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु करावी अशी मागणी सदस्यांनी केली. यासंदर्भात निधी विचारात घेऊन लवकर कामे मार्गी लावले जातील अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

रावेर पंचायत समितीत कनिष्ठ व वरिष्ठ सहाय्यक यांच्या रिक्त जागा कधी भरतील असा सवाल पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील यांनी विचारला. प्रशासनाकडून संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यावर रिक्त जागा भरल्या जातील असे उत्तर दिल्याने संतप्त सभापती पाटील यांनी आमचा कार्यकाळ संपल्यावर जागा भरल्या जातील काय ? असा प्रतिसवाल केला. त्यावर काँग्रेस गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष हे रावेरचे असल्याने सदर रिक्त जागा नक्कीच भरले जातील असा टोमणा मारला. यावर सभापती जितेंद पाटील यांनी रावेर तालुका उजाड झाला आहे असे सांगत भाजपाला घरचा आहेर दिला.

त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून शालेय पोषण आहारबाबत चौकशी करण्याची मागणी देखील पाटील यांनी केली होती त्याचे काय झाले या प्रश्नाचे उत्तर प्रशासन देऊ शकला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा अशी मागणी त्यांनी केली. सभापतींचे ऐकून घेतले जात नाही असा आरोप करीत हे प्रकरण दाबले जात आहे का ?असा सवाल जितेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.

Protected Content