कोरोना संसर्गामुळे विमा उद्योगाला सुगीचे दिवस

 

नवी दिल्ली , वृत्तसंस्था, । कोरोना संसर्गामुळे विविध उद्योग संकटात सापडले असताना विमा उद्योगाला मात्र चांगले दिवस आले आहेत. विशेषतः कोरोनामुळे स्वतःवर काही वाईट प्रसंग आल्यास कुटुंबीयांना आर्थिक साह्य मिळावे या हेतूने अधिकाधिक लोक विमा घेत आहेत. त्यातही टर्म विमा पॉलिसी काढण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निरीक्षण पॉलिसीबझार डॉट कॉम या ऑनलाइन विमा देणाऱ्या कंपनीने नोंदवले आहे.

टर्म प्रकारच्या विम्यामध्ये विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ मिळतो. आपल्यानंतर आपल्या कुटुंबाची वाताहत होऊ नये, या मूळ उद्देशाने टर्म विमा घेणाऱ्यांचे प्रमाण कोरोना काळात लक्षणीय वाढलेले दिसत आहे. त्यातही हा विमा घेताना एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या विमा पॉलिसीला वाढती मागणी दिसून येत आहे.

विविध प्रकारच्या टर्म विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी ५० टक्के ग्राहकांनी एप्रिल ते ऑगस्ट या काळात एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा टर्म विमा उतरवला आहे.

टर्म विमा घेण्यामागे लोकांची मानसिकता कोरोनामुले बदलली असल्याचे निरीक्षण आहे. विम्याकडे गुंतवणुकीचे चांगले साधन म्हणून पाहताना आता पारंपरिक विमा पॉलिसींपेक्षा अधिक प्राधान्य टर्म पॉलिसींना दिले जात आहे. विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इरडा) अधिकाधिक लोकांनी विमा घ्यावा यासाठी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न यामुळेही लोकांचा ओढा विम्याकडे वळला आहे.

विम्यासंदर्भातील निरीक्षणे – गेल्यावर्षीच्या तुलनेत ४२ ते ५० या वयोगटातील ७७ टक्के लोकांनी टर्म विमा घेतला आहे. ३१ ते ३५ वयोगटातील ३० टक्के लोकांनी उतरवलेल्या टर्म विम्याचा वाटा सर्वाधिक आहे. उच्च उत्पन्न गटातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांनी एक पटीपेक्षा अधिक रकमेचा टर्म विमा उतरवला आहे. यापैकी २५ टक्के लोकांनी दोन ते पाच कोटी रुपयांचा टर्म विमा घेतला आहे. स्वतःचा रोजगार असलेल्यांपैकी ४१ टक्के ग्राहकांनी ५० लाख रुपयांचे टर्म विमा संरक्षण घेतले आहे. याच गटातील ४० टक्के लोकांनी एक कोटी व त्यापेक्षा अधिक रकमेचा टर्म विमा काढला आहे. वेतनधारकांमध्ये ४० टक्के लोकांनी एक कोटींचा टर्म विमा, तर १० टक्के लोकांनी दोन कोटींचा, तर ३५ टक्के लोकांनी ५० लाख रुपयांचा टर्म विमा उतरवला आहे.

टर्म विमा घेण्यामागची कारणे — आपल्यानंतर कुटुंबासाठी आर्थिक तजवीज म्हणून, दरमहिना एक हजार रुपये इतका सहज परवडणारा प्रीमियम असल्यामुळे व कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेत कुटुंबाला दिलासा देण्यासाठी

Protected Content