व्यापारी संकुलांमधील दुकानदारांची फुटबॉल सारखी अवस्था ! (व्हिडिओ)

शेअर करा !

जळगाव, राहूल शिरसाळे । आता अनलॉक होऊन व्यवहार सुरू झाले असले तरी जळगावातील व्यापारी संकुलातील दुकानदारांबाबत अन्याय होत आहे. प्रशासनातील प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने त्यांचा अक्षरश: फुटबॉल झाला आहे. यामुळे शॉपींग कॉम्प्लेक्समधील दुकानदारांना ऑड-इव्हन सारखा फॉर्म्युला लागू करून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आज व्यापार्‍यांतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. जर शासनाने याबाबत निर्णय नाही घेतला तर दुकानदारांवर भीषण आपत्ती येणार असून त्यांना आत्महत्येची वेळ येणार असल्याचे सांगत यावर निर्णय घेण्याचे आवाहन व्यापार्‍यांनी केले आहे.

store advt

आम्ही जळगावात राहतो हे आमचे दुर्भाग्य का? असा प्रश्न महापालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानदारांनी उपिस्थत केला आहे.  यावेळी नटवर कंपाऊंड अध्यक्ष सपनभाई झुनझुनवाला यांनी प्रशासनाचा नाकर्तेपणा व ढिम्म प्रशासनासाठी व्यापारांना का वेठीस धरता? गेल्या ११५ दिवसात आपण काय नियोजन केले? पुरेसा सुविधा सुद्धा आपण देऊ शकलो का? असा प्रश्न उपस्थित केला. सराफ व्यवसायिक असोसिएशन अध्यक्ष स्वरूपभाई लुंकड :यांनी दुकानदारांची हालत फुटबॉलचे चेंडू सारखी झाली असल्याचे मत मांडत व्यापारी जर महापौराकडे गेले तर त्यांना आयुक्तांकडे पाठविले जाते. आयुक्ताकडे गेले तर ते उपायुक्तांकडे पाठवितात तसेच उपायुक्तांकडे गेले तर जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्यास सांगतात यात व्यापाऱ्यांचा अक्षरशः फुटबॉल केला असल्याचा आरोप श्री. लुंकड यांनी केला.

नाही तर आत्महत्या करू : मनोज वालेचा

मागील ११६ दिवसासंपासून वत्यांचे दुकान बंद असल्याने त्यांचे उपजीविकेचे साधन बंद झाले आहे. त्यांच्यावर त्यांचे कुटुंब तसेच त्यांच्याकडील कामगारांचे कुटूंब अवलंबून आहे. मात्र, उपजीविकेचे साधनच बंद असल्याने आम्ही कुठे जायचे. ठराविक कालावधीसाठी दुकान उघडू न दिल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याची व्याथा मनोज वालेचा यांनी मांडली.

व्यापाऱ्यांना सर्व कर माफ करा
फुले मार्केट कार्याध्यक्ष राजेशभाई वरयानी यांनी सांगितले की, गेल्या ११६ दिवसांपासून सर्व फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट व मनपा मालकीचे व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी शासनाचे म.न.पा.चे नियमांचे काटेकोरपणे पालन केले. या दिवसात आमचा लग्नसराईचा पूर्ण धंदा, पवित्र रमजान सणाचा पूर्ण धंदा व आता शालेय युनिफार्मचा पूर्ण धंदा झालाच नाही, आमचा पूर्ण वर्षभराचे नियोजन ढासळले म्हणून सर्व म.न.पा. संकुलाचे वतीने सर्व पदाधिकारी, प्रशासनास मागणी करतो की, आमचे कडून २०२०-२१ चे संपूर्ण भाडे, घरपट्टी, घराची व दुकानाची व इतर कर आकारण्यात येवू नये, ती संपूर्णतः माफ करावी.

दाणा बाजारात कोणत्याही सामाजिक अंतराचे पालन केले जात नाही. त्यांना १२ तास व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आम्हाला ६-७ तास ही व्यवसाय करण्यास परवानगी का नाही ? कोरोनाचा फ़ैलाव केवळ आमच्या दुकानांमुळेच होईल का ? असा उद्दिग्न प्रश्न फुले मार्केट उपाध्यक्ष बाबूशेठ कौरानी यांनी केला. आयुक्त व उपायुक्त यांना फुले मार्केटला पत्रे लावायची जाग १०२ दिवसांनी का आली ? एवढे दिवस त्यांना तेथील गर्दी, अतिक्रमण आटोक्यात का आणता आली नाही ? त्यांचे हप्ते बंद झाले का ? असा प्रश्न प्रदीप जैन यांनी उपस्थित केला. याप्रसंगी सेंट्रल फुले मार्केट अध्यक्ष रमेश मताणी उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!