Home Cities जळगाव शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी ; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतशिवारात...

शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी ; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतशिवारात कृषीवारी

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत तिफन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी” या अभिनव उपक्रमात जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “घेऊन हाती मूठभर माती, करूया शेतीची वारी” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत त्यांनी शेतशिवारात जाऊन माती हातात घेतली, शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि कृषी संस्कृतीशी आपली नाळ अधिक दृढ असल्याचा संदेश दिला.

आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि अर्थव्यवस्थेचे भक्कम अधिष्ठान असल्याचे अधोरेखित केले. शेतकरी हा देशाचा खरा अन्नदाता असून त्याच्या कष्टाचा समाजाने सन्मान केला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शेतकरी आणि शेतीप्रती कृतज्ञतेची भावना समाजात अधिक बळकट व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या अभिनव अभियानातून आषाढी वारीच्या अध्यात्मिक परंपरेला कृषी संस्कृतीची सुंदर जोड देण्यात आली. शेतकरी, शेती आणि माती यांच्याप्रती आदर व्यक्त करत शेतीचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. शेतशिवारात प्रत्यक्ष उपस्थित राहून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला तसेच शेतीसमोरील आव्हाने आणि शाश्वत कृषी पद्धतींच्या गरजेबाबतही चर्चा केली.

या उपक्रमाला उपस्थित शेतकरी, कृषी अधिकारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतीविषयी जनजागृती, पर्यावरणपूरक आणि शाश्वत कृषीचा प्रसार तसेच शेतकऱ्यांच्या योगदानाविषयी समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. कृषी क्षेत्राला समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक सन्मानाचे स्थान मिळावे, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. या प्रसंगी नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी अभियानास शुभेच्छा देत अशा उपक्रमांमुळे शेतीबाबत सकारात्मक जनजागृती होण्यास मदत होत असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, उपसंचालक भरत इंगळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound