Home धर्म-समाज विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात ‘सायबर वारकरी’; मुक्ताईनगरात डिजिटल सुरक्षेची अनोखी जनजागृती

विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात ‘सायबर वारकरी’; मुक्ताईनगरात डिजिटल सुरक्षेची अनोखी जनजागृती

0
1

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सच्या क्विक हील सायबर वॉरियर क्लब, क्विक हील फाउंडेशन आणि महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई मंदिर परिसरात सायबर सुरक्षेबाबत अनोखा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. विठ्ठल-रुक्मिणी आणि वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी भाविकांना डिजिटल सुरक्षेचे महत्त्व पटवून देत परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम घडवून आणला.

या उपक्रमात स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सच्या २० विद्यार्थ्यांनी “सायबर वारकरी” ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात साकारली. विठ्ठलाच्या भूमिकेत जय ठाकूर, रुक्मिणीच्या भूमिकेत टीना पाटील तर इतर विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात सहभागी होत सायबर सुरक्षेचे संदेश देणारे फलक, पोस्टर्स आणि विशेष कॅप्सच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या अनोख्या सादरीकरणामुळे मंदिर परिसरात उपस्थित वारकरी आणि भाविकांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले.

आषाढी एकादशीनिमित्त मंदिर परिसरात आलेल्या तीन वेगवेगळ्या पालख्यांसमोर विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य आणि नृत्य सादर केले. या माध्यमातून ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी (OTP) आणि यूपीआय (UPI) फसवणूक, सोशल मीडियाचा गैरवापर तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी या विषयांवर अत्यंत सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने जनजागृती करण्यात आली. त्यामुळे उपस्थित भाविकांना सायबर गुन्ह्यांविषयी सहज समजेल अशा भाषेत माहिती मिळाली.

उपक्रमादरम्यान सायबर वॉरियर्सनी वारकऱ्यांशी थेट संवाद साधत मोबाईलचा सुरक्षित वापर, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, बँकिंगशी संबंधित गुप्त माहिती कोणालाही न देणे, अशा महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. भाविकांच्या विविध शंकांचे समाधान करत त्यांना ‘सायबर सेफ कार्ड्स’चे वाटप करण्यात आले. या कार्ड्सवर सायबर सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण सूचना आणि आपत्कालीन संपर्क क्रमांकांची माहिती देण्यात आली होती.

जनजागृती अधिक प्रभावी व्हावी यासाठी सायबर सुरक्षेवर आधारित प्रश्नमंजुषा, संवादात्मक उपक्रम आणि छोटे खेळही आयोजित करण्यात आले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविकांनी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. परंपरा, संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाद्वारे ५०० हून अधिक वारकरी आणि भाविकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश यशस्वीपणे पोहोचविण्यात आला. अनेक भाविकांनी विद्यार्थ्यांसोबत छायाचित्रे काढत या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबच्या अध्यक्षा जान्हवी सपकाळे, मीडिया डायरेक्टर राहुल चोपडे, सचिव वैष्णवी सैतवाल तसेच जय ठाकूर, अक्षय पाटील, लोकेश पाटील, टीना पाटील, दर्शना चौधरी, ऋषिकेश भोजने, भावेश पाटील, प्रियदर्शिनी भांडारकर, खुशबू लांबोळे, तनिषा महाजन, तेजस्विनी पाटील, साक्षी पाटील, विद्या सोनवणे, वैष्णवी पाटील आणि स्नेहल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांना समन्वयक प्रा. राजू आमले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भविष्यातही अशाच सर्जनशील माध्यमातून समाजात सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

 


Protected Content

Play sound