ख्यातनाम व्यंग कवी संपत सरल करणार विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येत्या ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी येथे अमळनेर भरणार्‍या १८ व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन जयपूर (राजस्थान) येथील सुप्रसिद्ध विद्रोही व्यंग कवी संपत सरल यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी मुंबई प्रेस क्लब येथे बैठकीत केली.

या पत्रकार परिषदेला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम पाटील, मुख्य संयोजक डॉ. लिलाधर पाटील निमंत्रक रणजित शिंदे, मुख्य समन्वयक प्रा.अशोक पवार , डी. ए. पाटील आदी उपस्थित होते. संपत सरल, आज हे नाव जगभर लोकशाही मुल्यांवर निष्ठा असणारा विद्रोही कवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९६२ रोजी राजस्थानमधील शेखावती या गावी झाला. हास्य व व्यंगाच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारा विद्रोही कवी म्हणून त्यांनी जगभर आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या गावच्या शाळेतून घेतले, त्यानंतर त्यांनी जयपूर येथून उच्च शिक्षण घेतले आणि राजस्थान विद्यापीठातून बी.एड. केले आणि नंतर त्यांनी कवींमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

संपत सरल यांनी संपूर्ण भारतासह यूएसए, कॅनडा, ओमान, सिंगापूर, हॉंगकॉंग, यूएई, थायलंड, सौदी अरेबिया आणि नेपाळ आदी विविध देशात आपले काव्य आणि मुशायरा सादर केले आहेत. समकालीन राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करणारे विद्रोही व्यंगकवी म्हणून त्यांना ओळखले जाते. आपल्या सत्य आणि निर्भिड अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. ’ चाकी देख चुनाव की ’ आणि ’ छद्मविभूषण ’ हे त्यांचे काव्य संग्रह तर ‘हम है ना’, ‘करम धरम’, ‘चक्कर पे चक्कर’, ‘बेटा बेटी के लिए’, ही टीव्ही वरील नाटके प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून विद्रोही मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते. आता पर्यंत मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नंदुरबार, सिंधुदुर्ग, धुळे इ. ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलने आयोजित केली आहेत. महाराष्ट्रातील आयु. बाबुराव बागुल, वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज नदाफ, आत्माराम राठोड, तारा रेड्डी, तुलसी परब, जयंत पवार, डॉ. आ. ह. साळुंके, उर्मिलाताई पवार आदी सर्जनशील, प्रगतीशील साहित्यिक नाटककार, कवी आदींनी संमेलनाची अध्यक्षपदे भूषवित विद्रोही साहित्य संस्कृतीचा आवाज आपल्या अध्यक्षीय मांडणीतून बुलंद केला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्क्सवादी विचारवंत डॉ. एजाज, प्रसिद्ध शायर निदा फाजली, डॉ. उमा चक्रवर्ती, मा. सुशिला टाकभौरे, आयु. जयंत परमार, गोहार रझा, रसिका आगाशे, आदींनी विद्रोही साहित्य संमेलनांचे उद्घाटने करून विद्रोही जागरात आपला सहभाग नोंदविला आहे.
दरम्यान, यंदाचे १८ वे विद्रोही साहित्य संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे मध्ये भरविले जाणार आहे. अमळनेरची भूमी ही ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असा खरा प्रेममय धर्म सांगत अन्यायाच्या विरोधात ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’…असे अजरामर गीत लिहून मंदिर प्रवेशासाठी उपोषण आंदोलन करणार्‍या साने गुरुजींची कर्मभूमी आहे. यंदाचे हे संमेलन आम्ही प्रेममय सत्य धर्म आणि समता, स्वतंत्र, बंधुत्व या मूल्य समर्थनार्थ या आशयसूत्रावर (थीम) आधारित घेत आहोत. धुळे रोडवरील आर. के. नगरच्या समोरील भव्य प्रांगणात हे संमेलन होणार असून दोन दिवस चालणार्‍या या संमेलनात ३ परिसंवाद, २ कवी संमेलने, गटचर्चा, कथाकथन, युवा मंच, बालमंच, विचार दिंडी इ. असणारी आहे.

देशाच्या केंद्रसत्तेत मोदी-शहा सरकारच्या निमित्ताने अघोषित आणीबाणी सुरू करून संविधानाने सर्व नागरिकांना बहाल केलेल्या मूलभूत हक्कांचाच गळा घोटण्यास सुरुवात केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सर्वोच्च गळचेपी सुरू आहे. कधी लाभाच्या पदांची आमिष तर कधी दहशत-दडपशाहीच्या मार्गाने-धमकावत विषमतावादी संस्कृती पसरवली जात आहे. प्रसार माध्यमांवरील दडपशाही अधिकच वाढली आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ त्याविरूध्द ठामपणे लोकशाही मूल्यांसाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र यासाठी कायम संघर्षरत आहे. मोदी शहांच्या या अघोषित आणीबाणीच्या विरोधात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईत आमच्यासोबत विद्रोही कवी संपत सरल हे आहेत याचा विशेष आनंद आहे.असे यावेळी प्रा.डॉ.लिलाधर पाटील यांनी सांगितले.

पू.सानेगुरुजीं यांच्या आंतरभरतीचा प्रयोग साकारला जाणर्‍या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून वाचक, श्रोते, प्रेक्षक, रसिक,सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन साहित्य संमेलनाचे निमंत्रक रणजित शिंदे व स्वागताध्यक्ष श्याम पाटील यांनी याप्रसंगी केले आहे.

Protected Content