उपमहापौरांनी केली कामाची पाहणी; परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

जळगाव, प्रतिनिधी । उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पिंप्राळ्यातील प्रभाग क्रमांक दहामध्ये सुरू असलेल्या कामांची आज पाहणी केली. यासोबत त्यांनी परिसरातील जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रयत्नांनी पिंप्राळा परिसरातल्या प्रभाग क्रमांक दहामध्ये ३ कोटी ५९ लाख रूपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. यातील रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली असून लवकरच गटारींची कामे होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही कामे प्रगतीपथावर आहेत. तर प्रभागात अजून साडे सहा कोटी रूपयांची कामे सुरू होणार आहेत.

या अनुषंगाने आज उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रभागात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यात त्यांनी संबंधीत काम चांगल्या प्रतिचे होते की नाही ? याची खातरजमा केली. यासोबत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रभाग क्रमांक १० आणि परिसरातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यात परिसरातील नागरिकांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडून आमच्या भागातही विकासकामे करण्याचे साकडे घातले. यावर उपमहापौर पाटील यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासोबत बांधकाम अभियंता जगताप, मक्तेदार युवराज पाटील, स्वप्नील पाटील, दीपक कुमार आदीसह अन्य मान्यवर व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

विकासापासून कोसो लांब असणार्‍या पिंप्राळा परिसरामध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विकासाचे एक नवीन पर्व सुरू झाले आहे. यात रस्ते आणि गटारी या मुलभूत सुविधांसह अन्य विकासकामांचे प्रश्‍न मार्गी लागणार असल्याने परिसरातील नागरिकांनी उपमहापौरांचे आभार मानले आहेत.

Protected Content