



पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील नागरी समस्यांकडे केवळ कार्यालयातून पाहण्याऐवजी प्रत्यक्ष कामातून उपाय शोधण्याचे उदाहरण पारोळ्यात पाहायला मिळाले आहे. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा विद्युत पंप नादुरुस्त झाल्याने प्रभाग क्रमांक ११ मध्ये मागील आठ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. या परिस्थितीत प्रभाग क्रमांक ११ चे नवनिर्वाचित नगरसेवक विवेक पतंगराव पाटील यांनी चक्क स्वतः पुढाकार घेत पाण्याचा पंप दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष काम सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील विद्युत मोटर बंद पडल्यामुळे संपूर्ण परिसरात पाण्याचा पुरवठा ठप्प झाला होता. वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांची गैरसोय वाढली होती. अखेर या गंभीर प्रश्नाची दखल घेत नगरसेवक विवेक पाटील यांनी कोणतीही औपचारिकता न ठेवता स्वतः कपडे काढून दुरुस्तीच्या कामात सहभाग घेतला. त्यांच्या या कृतीमुळे काही वेळातच मोटर दुरुस्त झाली आणि प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये आठ दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. ही बाब लक्षात येताच नगरसेवक विवेक पाटील यांच्यासह राहुल पवार यांनीही प्रत्यक्ष लक्ष घालून समस्या तातडीने सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. दोघांनी मिळून संबंधित कर्मचाऱ्यांशी समन्वय साधत आणि प्रत्यक्ष श्रमदान करत पाणीपुरवठा पूर्ववत केला.
नगरसेवकाने स्वतः दुरुस्तीचे काम केल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले. लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करत असल्याचे हे उदाहरण असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दरी कमी करत थेट जनतेच्या प्रश्नात उतरलेले नेतृत्व म्हणून विवेक पाटील यांचे कौतुक होत आहे.



