
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव-आसोदा रोडवरील रेल्वे फाटक क्रमांक 149 येथील उड्डाणपुलाची अवस्था अवघ्या दहा महिन्यांतच दयनीय झाली आहे. तब्बल 52 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या दोन मार्गीका पुलाचे लोकार्पण 5 जानेवारी 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार गिरीश महाजन, राजू मामा भोळे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडले होते. मात्र आता या पुलावर असंख्य खड्डे, पडलेल्या भेगा आणि बंद स्ट्रीट लाईटमुळे अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांत संतापाचा सूर उमटतो आहे.
या पुलाची लांबी 680.1 मीटर असून मध्य रेल्वेच्या मनमाड-भुसावळ विभागातील जळगाव ते भादली रेल्वे स्थानकाच्या दरम्यानचा हा महत्त्वाचा भाग आहे. रोज हजारो वाहने या मार्गावरून धावतात. परंतु, केवळ काही महिन्यांत पुलावरील डांबरीकरण उखडू लागले आहे. जागोजागी मोठे व लहान खड्डे तयार झाले असून काही ठिकाणी रस्त्यावर खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार, तसेच चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पुलावरील स्ट्रीट लाईट देखील कार्यान्वित नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य पसरते. या पुलाला वळण असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज लागत नाही आणि अपघातांची शक्यता वाढते. काही ठिकाणी अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेषतः एका ठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे तक्रारी वाढल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करून सिमेंट टाकले, मात्र सिमेंट टाकताना वापरलेली वाळू आणि खडी अजूनही तिथे पडून आहे. त्या खड्यांवरून वाहनचालक घसरून पडत असल्याचं स्थानिकांनी लाईव्ह ट्रेंड्सशी बोलताना स्पष्ट केलं.
शासनाने एवढ्या मोठ्या खर्चाने उभारलेला हा पूल नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी बांधण्यात आला होता. परंतु आता तोच पूल लोकांच्या जिवाला धोका ठरू लागला आहे. नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून या भागातील रहिवाशांनी या उड्डाणपुलाची त्वरित व दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.



