जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वेतील चोरी प्रकरणातील संशयित रमजान भिकन शेख उर्फ रॅन्चो (२५, रा. गेंदालाल मिल, जळगाव) याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे त्याचे कुटुंबीय व लोहमार्ग पोलिसांमध्ये वाद झाला. वाद वाढल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित व अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारीदेखील रुग्णालयात पोहचले. रॅन्चोची प्रकृती खालावल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसमध्ये २ ऑक्टोबर रोजी ९ लाख रुपयांची चोरी झाली होती. या चोरीचा लोहमार्ग पोलिस तपास करीत असताना ही चोरी रमजान शेख याने केल्याचे सीसीटीव्हीद्वारे समोर आले होते. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली व तो भुसावळ येथे कोठडीत होता. त्याला फिट येऊन त्याची प्रकृती खालावल्याने त्याला मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीविषयी माहिती मिळाली व त्याचे कुटुंब घाबरून गेले. ते रुग्णालयात पोहचले व आरोप-प्रत्यारोप होऊ कुटुंबीय व लोहमार्ग पोलिसांमध्ये वाद झाला. हा वाद वाढतच गेल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित व अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारीदेखील रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी कुटुंबीयांची समजूत काढत वाद मिटविला. रॅन्चोची प्रकृती खालावल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.