कॉंग्रेसच्या काळातील कोळी समाजातल्या अन्यायाबाबत बोला : अमित सोळुंके यांचे प्रत्युत्तर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कॉंग्रेसच्या काळात कोळी समाजावर काय अन्याय झाला याबाबत बोलावे असे प्रत्युत्तर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अमित सोळुंके यांनी दिले आहे.

जळगावात सध्या कोळी समाजाच्या जात पडताळणी आणि प्रमाणपत्राबाबतच्या पिळवणुकीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून विविध पक्षाच्या नेत्यांनी याला पाठींबा दिला आहे. या अनुषंगाने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी दिनांक १६ ऑक्टोबर रोजी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दर्शविला होता. याप्रसंगी त्यांनी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्‍न प्रलंबीत ठेवण्याबाबत ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यावर टिका केली होती.

 

दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अमित सोळुंके यांनी या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी   ना.  गिरीषभाऊ महाजन हे प्रयत्नशील आहेत. माजी खासदार डॅा. उल्हास पाटीलांनी कॅांग्रेस सरकारच्या काळात कोळी समाजावर झालेल्या अन्यायाबाबत बोलावे असे नमूद करत त्यांनी डॉ. पाटील यांच्यावर टिका केली आहे.

 

याबाबत ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार असतांना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते व त्यावेळी १८ मे २०११ रोजी शासन निर्णय काढत जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या कोळी समाजातील नोकरदारांना कमी करण्याचा निर्णय घेतला होता. आताच्या युती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन व आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाने अधिसंख्य पदे निर्माण करून कोळी समाजातील नोकरदार वर्गाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संरक्षण देण्यात आले आहे.

 

युती सरकार लवकरच जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र याबाबत कोळी समाजाला न्याय मिळवून देईल, त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व संकटमोचक ना. गिरीषभाऊ महाजन हे प्रयत्नशील असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अमित सोळुंके यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Protected Content