आदिशक्ती मुक्ताईस नारळ वाढवून सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | विरोधक खाजगी संस्थाना बेकायदेशीर कर्ज दिल्याचा आरोप करत आहेत. परंतु, रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या नियमानुसार तारण ठेवून सर्व कर्ज दिलेले आहेत. त्याची कर्जफेड नियमित आहे, त्यातून बँकेला मोठया प्रमाणावर व्याज मिळत आहे असे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी केले. ते खडसे फार्म येथे मतदारांचा मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

 

 

महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मुक्ताई मंदिर येथे आदिशक्ती मुक्ताईचे विधिवत पुजन करून आणि नारळ वाढून करण्यात आला. त्यानंतर मतदारांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतिष अण्णा पाटील, जळगाव महापौर जयश्री महाजन,माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, दिलीप सोनवणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, संजय पवार, नाना राजमल पाटील, संजय गरुड, रोहिणी खडसे खेवलकर, शिलाताई निकम, मेहताबसिंग नाईक, श्यामकांत सोनवणे, विनोद तराळ, रवींद्र नाना पाटील, वंदना ताई पाटील, एजाज भाई मलिक, मंगला पाटील, कल्पिता पाटील, सरिता माळी,वाल्मिक पाटील, रमेश नागराज पाटील, डी. के. पाटील, सोपान पाटील, ईश्वर रहाणे, यू. डी. पाटील, निवृत्ती पाटील, सुधाकर पाटील, दशरथ कांडेलकर, विलास धायडे, राजू माळी, शिवराज पाटील, अरविंद गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी मंत्री एकनाथराव खडके पुढे म्हणाले की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकाराचा समृद्ध वारसा असलेली आशिया खंडातील अग्रणी बँक आहे. स्व. प्रल्हादभाऊ पाटील, जे. एस. अप्पा, ओंकार अप्पा वाघ यांच्या सारखे अध्यक्ष राहिलेली हि बँक आहे. त्यांनी जिवापाड मेहनत करून बँकेला वैभव, नावलौकिक प्राप्त करून दिला. मध्यंतरी काही चुकीच्या निर्णयामुळे बँकेची आर्थिक स्थिती खालावली होती. ती सुस्थितीत आणण्यासाठी मागच्या पंचवार्षिकला सर्वपक्षीय पॅनलची निर्मिती केली. त्यांनंतर रोहिणी खडसे या चेअरमन झाल्या सर्व संचालक मंडळाने पारदर्शक पद्धतीने काटकसरीने कारभार केला. त्यातुन बँकेला असलेला संचित तोटा ६०० कोटी पर्यंत भरून काढण्यात संचालक मंडळाला यश आले. आज विरोधक खाजगी संस्थाना बेकायदेशीर कर्ज दिल्याचा आरोप करत आहेत. परंतु, रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या नियमानुसार तारण ठेवून सर्व कर्ज दिलेले आहेत. त्याची कर्जफेड नियमित आहे, त्यातून बँकेला मोठया प्रमाणावर व्याज मिळत आहे. हे सर्व नियमानुसार झालेले आहे. विरोधकांना जी चौकशी करायची असेल ती करा. यापुढे सुद्धा येणारे संचालक मंडळ पारदर्शक पद्धतीने कारभार करेल याची मी ग्वाही देतो. गेल्या संचालक मंडळाने ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवली. बँकेचे संगणकीकरण करून कारभार जलद गतीने केला. सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने नियमानुसार केले. त्यामुळे बँक एनपीए मधून बाहेर आली. बँकेचा मोठया प्रमाणात संचित तोटा भरून निघाला बँक क वर्गातून अ वर्गात आली. हे सर्व शेतकरी बांधवांच्या सभासदांच्या मतदारांच्या सहकार्याने,विश्वासाने आणि आशीर्वादाने शक्य झाले. बँकेची ही घोडदौड अशीच कायम राखण्यासाठी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे त्यांनी आवाहन केले.

Protected Content