लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नामांकित फायनान्स कंपनीतून लोन मंजूर करून देतो असे सांगून धरणगाव शहरातील एका व्यावसायिकाची ९ लाख १५ हजार ९८ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात बनावट नावे सांगणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जीवनराम आनंदाराम कुमावत (वय-४२) रा. एमआयडीसी परिसर, धरणगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. व्यापारीचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २७ मार्च रोजीपासून त्यांना त्यांच्या मोबाईलवर मिनाक्षी अग्रवाल, आलिया, रूही शर्मा, सुधीर सक्सेना असे वेगवेगळे नाव सांगून जीवनराम कुमावत यांच्याशी संपर्क साधला.  नामांकित फायनान्स कंपनीतून लोन मिळवून देतो असे खोटे सांगून याच कंपनीसह इतर कंपनीच्या पॉलीसी काढण्यास भाग पाडून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर २७ मार्च २०२३ ते २६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत त्यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने एकुण ९ लाख १५ हजार ९८ रूपये ऑनलाईन मागवून घेतले. त्याच्या मोबदल्यात कोणत्याही प्रकारचे लोन मंजूर न करता फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंगळवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिवनराम कुमावत यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार वेगवेगळे बनावट नावे सांगणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात जळगाव सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Protected Content