बंद घर फोडून ७६ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविला

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावात तरुणाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ७६ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून गेल्याची घटना बुधवार १० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, देवेंद्र प्रवीण पाटील वय-२८ रा. मंगरूळ ता. अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने मंगळवारी ९ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता ते घर बंद करून बाहेर गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत घराचा दरवाजाचे लोखंडी कुलूप तोडून घरातून सोन्याची पोत, कानातले दागिने, मंगळसूत्र आणि चांदीचा गोफ असा एकूण ७६ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार बुधवार१० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता उघडकीला आला. दरम्यान याप्रकरणी देवेंद्र पाटील यांनी अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सकाळी ११ वाजता अज्ञात चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय संजय पाटील हे करीत आहे.

Protected Content