६८ वर्षीय रूग्णावर पेसमेकरची मोफत शस्त्रक्रिया
जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तीन महिन्यांपासून छाती दुखत असलेल्या ६८ वर्षीय रूग्णाला शिबीरातील तपासणीने उपचाराचा योग्य मार्ग दाखविला. या रूग्णावर पेसमेकरची मोफत शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ञांच्या प्रयत्नामुळे यशस्वी ठरली.
याबाबत माहिती अशी की, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे जळगाव जिल्ह्यासह विदर्भातही आरोग्य तपासणी शिबीर निरंतर सुरू आहे. या शिबीरांचा शेकडो रूग्णांना आत्तापर्यंत लाभ झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवटबकाल येथे नुकतेच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचे तपासणी शिबीर झाले. मुक्ताईनगर तालुक्यातील धुळे येथील रहिवासी असलेले विश्वनाथ ज्योतीराम इंगळे (वय ६८) यांना तीन महिन्यांपासून सतत छातीत दुखत होते. गेल्या महिन्याभरापासून त्यांना श्वास घ्यायला देखिल त्रास होत होता. तसेच त्यांची डावी बाजू देखिल दुखत होती. हि लक्षणे लक्षात घेता त्यांनी वरवटबकाल येथे झालेल्या शिबीरात तपासणी करून घेतली. या तपासणीत त्यांच्या हृदयाचे ठोके अत्यंत कमी होते. अशा परिस्थितीत शिबीरातील डॉक्टरांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या हृदयालयात भरती केले. या ठिकाणी विश्वनाथ इंगळे यांची हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील आणि डॉ. स्वप्नील सांबापुरे यांनी तपासणी केली. तसेच त्यांच्या हृदयाची एन्जीओग्राफीही करण्यात आली. सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्यानंतर त्यांच्यावर पेसमेकरची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च हा विश्वनाथ इंगळे यांना झेपावणारा नव्हता. अशा वेळी त्यांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात लागू असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कागदपत्रांची पूर्तता करून प्रकरण मंजूर करण्यात आले. त्यानंतर विश्वनाथ इंगळे यांच्यावर डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील आणि डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. स्वप्नील सांबापुरे यांनी पेसमेकरची शस्त्रक्रिया यशस्वी केली. ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेत संपूर्ण मोफत झाली. या शस्त्रक्रियेनंतर रूग्णाच्या देखभालीसाठी निवासी डॉ. दिनेश चौधरी, डॉ. सचिन संगपवाड, कॅथलॅब तंत्रज्ञ सुधाकर बिराजदार, परिचारिका मेरी जैन, दिपाली भानबेरे, मार्केटींग मॅनेजर रत्नशेखर जैन यांनी सहकार्य केले.
शिबीरामुळे वाचलो तीन-चार महिन्यांपासून छाती दुखत होती. स्थानिक ठिकाणी तपासणी केली. परंतु निदान होत नव्हते. अखेर वरवटबकाल येथे डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचे शिबीर असल्याची माहिती मिळाली. या शिबीरात तपासणी केली असता हृदयविकाराचे निदान झाले. तत्काळ मी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात भरती झालो आणि माझ्या हृदयाची मोफत शस्त्रक्रिया झाली. शिबीरामुळेच आज मी वाचलो. त्याबद्दल रूग्णालयाचे आभार मानतो. – विश्वनाथ इंगळे, रूग्ण.