अमळनेर प्रतिनिधी | येथील व्यापारी संकुलात मध्यरात्रीच्या सुमारास एका तरूणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली असून यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अमळनेर येथील हशीमजी प्रेमजी संकुलात रात्री खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील जुना पारधी वाडा येथील रहिवासी असणार्या प्रकाश दत्तू चौधरी उर्फ बापू चौधरी (वय ३५ वर्षे) या तरूणाची गळा चिरून हत्या झाल्याचे सकाळी सफाई कामगारांना दिसल्याने त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृत तरूणाची ओळख पटवून त्याच्या कुटुंबियांना याची माहिती दिली.
घटनेचे वृत्त कळताच एपीआय राकेशसिंग परदेशी, हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर, नगरसेवक नरेंद्र संदानशीव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता हा खून पैशांच्या वादातून झाल्याची माहिती मिळाली. कैलास पांडुरंग शिंगाणे याने हे कृत्य केल्याचे आढळून आले. खून केल्यानंतर शिंगाणे हा घटनास्थळावरून फरार झाला होता. तथापि, पोलिसांनी त्याला चोपडा येथून ताब्यात घेतले असून त्याला आज दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.