बसमधुन विवाहितेचे लाखो रूपयांचे दागिने लांबविले; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकातून भोकर येथे जाण्यासाठी बसमध्ये बसलेल्या विवाहितेची बॅक कापून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकुण लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आज दुपारी उघडकीला आले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुनम श्रावण सोनवणे (वय २८, रा. अहमदाबाद)  व त्यांच्या आई इंदूबाई हे दोघे आज गुरूवारी ४ मार्च रोजी सकाळी  अहमदाबाद येथून हावडा मेलने जळगावात दाखल झाल्या. तालुक्यातील भोकर येथे नातेवाईकांकडे लग्न समारंभासाठी दोघी जाण्यासाठी शहरातील नवीन बसस्थानकात येथे पोहचल्या. भोकर येथे जाण्यासाठी दुपारी १ वाजता त्या नवीन बसस्थानकातून जळगाव-चोपडा बसमध्ये बसल्या. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामळे त्यांना जागा मिळाली नाही. 

काही वेळाने एका प्रवाशाने मदत करण्याचा बहाणा करुन वाहकाच्या सीटमागे एक जागा पुनम यांना बसण्यासाठी दिली. यावेळी त्यांनी बॅग मागच्या सीटखाली ठेवली होती. त्यांना मदत करणारा प्रवासी बॅगवर लक्ष ठेऊन होता. दरम्यान आपण ज्या बसमध्ये बसलो आहे, ती भोकरकडून जात नसल्याचे लक्षात आल्यावर पूनम व त्यांची आई विदगाव येथे उतरल्या.  खाली उतरल्यावर बस निघून गेल्यानंतर पूनम यांना बॅग कापल्याचा दिसून आले. बँग उघडून पाहिले तर  ६ तोळे सोन्याचे दोन दागिणे व २ हजार ५०० रूपये रोख चोरून नेल्याचे दिसून आले.  यानंतर पूनम यांनी तक्रारीसाठी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. पूनम सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

Protected Content