भुसावळ, प्रतिनिधी । एकही कोरोना रुग्ण उपचारापासून वंचीत राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभियान चालवत आहेत. यासोबत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न करतांना दिसत असतांना स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने बामणोद गावामध्ये आठवडे बाजारात गर्दी करून महिला-पुरुष सर्व नियमांचा फज्जा उडवितांना दिसत आहे.
अधिक माहिती अशी की, दर मंगळवारी बामणोद या गावी बाहेरील व्यापारी चक्क पोलीस चौकीच्या समोर आठवड्याचा बाजार लावतात. हा सर्व प्रकार पोलीस कर्मचारी उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा त्यांच्यावर कारवाई करीत नाही. एकीकडे जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२० पर्यत ३७(१) व (३) कलम लागू करण्यात आले आहे.
याबाबत दिनांक ७ सप्टेंबर रोजी आगामी सण,व उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधीत राहण्याकरिता २१ सप्टेंबर पर्यत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश लग्न, मिरवणूक धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही असेही अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी आदेशात म्हटले आहे. तर दुसरीकडे सर्व आदेशांचे उल्लंघन करतांना बाजारात व्यापारी तसेच ग्राहक तोंडाला विनामास्क लावून फिरतांना दिसत आहेत.
बाजारात सॅनिटायझर फवारणी कुठेही करण्यात आलेली नसल्याने ग्रामपंचायत व प्रशासन गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ करीत आहे. आजरोजी बाजारात म्हैसवाडी, वनोली-कोसगाव,बामणोद,आमोदा पाडळसा येथील गावकरी तसेच व्यापारी व शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी केली आहे.