ऑक्सफर्डची कोरोना लस घेणारा पडला आजारी; चाचणी बंद करण्याचा निर्णय

नवी दिल्ली । ऑक्सफर्डने कोरोनावरील लसीची चाचणी बंद घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही लस घेतलेला व्यक्ती पुन्हा आजारी पडल्याने हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे कोरोना विरूध्दच्या लढ्याला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

कोरोनाच्या प्रतिकारासाठी आवश्यक असणारी लस नेमकी केव्हा येणार याकडे जगभरातील अब्जावधी लोकांचे लक्ष लागले आहे. यातच ऑक्सफर्डने एझेडडी१२२२ ही लस तयार करण्याची घोषणा करून या स्पर्धेत आघाडी घेतली होती. याच्या तीन चाचण्या यशस्वी झाल्या होत्या. तथापि, या लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची कोरोनाची लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर लसीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश-स्वीडिश कंपनी अ‍ॅस्ट्रोझेन्सीया पीएलसी यांनी संयुक्तपणे ही लस तयार केली असून भारतातही या लसीची चाचणी सुरु करण्यात आली होती. ब्रिटनमध्ये तिसर्‍या टप्प्यातील चाचणीवेळी एका व्यक्तीला लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडली असून काही दुष्परिणाम जाणवले. या व्यक्तीला रुग्णालयातही दाखल करावं लागले आहे. यामुळे आता या लसीची चाचणी थांबविण्यात आली आहे. कोरोना विरूध्दच्या लढ्याला यामुळे धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Protected Content