जळगाव प्रतिनिधी । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर २५ जुलै रोजी रात्री १० वाजता केलेल्या गोळीबार प्रकरणात अटकेत असलेले पाच संशयित आरोपींनी आज गुरूवार २६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असता न्यायमुर्तींनी सर्वांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
याबाबत माहिती अशी की, रविवारी २५ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर इनोव्हातून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला होता. यात सुदैवाने त्यांना काही झाले नाही या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. कुलभूषण पाटील यांनी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गोळीबार प्रकरणात रामानंदनगर पोलीसांनी वेगवेगळ्या भागातून गोळीबार करणारे संशयित आरोपी मंगलसिंग युवराज राजपूत (वय-३२), किरण शरद राजपूत (वय-२४ ), उमेश पांडुरंग राजपूत (वय-२१), महेंद्र राजपूत सर्व रा. पिंप्राळा आणि जुगल संजय बागुल वय २२ रा. मयुर हौसिंग सोसायटी, खोटेनगर यांनी अटक केली. सर्व संशयितांना कारागृहात रवानगी केली आहे. यातील भुषण गौतम बिऱ्हाडे हा संशयित आरोपी फरार आहेत. दरम्यान, फरार संशयित आरोपी बिऱ्हाडे यांने अटकपुर्व जामीन आणि कारागृहात असलेल्या सर्वांनी आज गुरूवार २६ ऑगस्ट रोजी जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असता सर्वांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याकामी सरकारी वकील अडॅ. रमाकांत सोनवणे यांनी काम पाहिले.