सहाय्यक तलाठीला धक्काबुक्की करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टरवर कारवाई करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले होते. यावेळी ट्रॅक्टरची नोंद करीत असतांना ट्रॅक्टर चालक अजय समाधान कोळी रा. निमखेडी ता.जि.जळगाव याने सहाय्यक तलाठी यांना धक्काबुक्की करून बॅरीकेट्स तोडून वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेल्याची खळबळजनक घटना मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील आकाश विजय काळे हे म्हसावद येथे सहाय्यक तलाठी म्हणून नियुक्त आहेत. मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांना अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी व जळगाव तालुक्यातील होणारी अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी पथक तयार केले आहे. या पथकामध्ये कंडारी येथील तलाठी प्रज्ञाराणी वंजारी, नांद्रा येथील तलाठी राजकन्या घायवट, पोलीस अंमलदार अजय ठाकूर यांचा समावेश आहे. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर यांनी पथकाला अजिंठा चौकात बोलाविले. याठिकाणी त्यांनी विना क्रमांकाचे वाळूने भरलेले वाहन पकडले होते. पथक याठिकाणी दाखल झाल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पकडलेले ट्रॅक्टर पथकाच्या ताब्यात देवून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पथक वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात आणण्यात आले. याठिकाणी ट्रॅक्टरची वाळू वाहतुकीच्या रजिस्टरमध्ये नोंद करत असतांना दुपारी २ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरवरील चालक अजय समाधान कोळी (रा. निमखेडी) याने सहाय्यक तलाठी यांना धक्का मारला आणि त्याठिकाणी लावलेले बॅरीकेट्स तोडून ट्रॅक्टर घेवून पसार झाला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content