नियमित योगामुळे आजारांपासून मुक्ती अन एकाग्रतेत वाढ – प्रा. पंकज खासबागे (व्हिडीओ)

MJ College News

जळगाव, प्रतिनिधी । प्रत्येक विद्यार्थ्यांने सकाळी उठल्याबरोबर सुर्यनमस्कार, आसने, प्राणायाम आणि ध्यान केल्यास आळस आणि आजारांपासून मुक्ती मिळते व एकाग्रतेत वाढ होते, असे प्रतिपादन प्रा. पंकज खासबागे यांनी आज (दि.४) येथे केले. येथील मु.जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपर्थी विभागातर्फे विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या योग शिबिराचा आज समारोप करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या शिबिराच्या समारोपप्रसंगी योग विभागाचे प्रा.पंकज खासबागे, शाळेचे समन्वय गणेश लोखंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात गुरूवंदना आणि ओंकारने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा गुलाबपुष्प व झाडांची रोपे देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा. खासबागे यांनी योगाची व्याख्या, योग कोणी, कसे व कधी करावे, याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, अभ्यास करून मोठे होण्याचे स्वप्न सगळेच बघत असतात. या स्वप्नांमुळे आपण स्वत:ला अभ्यासात वाहून घेतो, मात्र त्याचवेळी आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो. मग भविष्यात होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने सकाळी उठल्याबरोबर सुर्यनमस्कार, आसने, प्राणायाम आणि ध्यान केल्यास आळस आणि आजारांपासून मुक्ती मिळते. शिवाय अभ्यासात एकाग्रता वाढून गुणांमध्ये नक्कीच वाढ होते.

एम.ए.योगिक सायन्सच्या द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून या शाळेतील पाचवीच्या १२० विद्यार्थ्यांना १० दिवस मोफत योग शिबीरद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात प्रत्येक विद्यार्थ्यांला सुर्यनमस्कार, आसने, प्राणायाम आणि ध्यान याबाबत माहिती देवून प्रात्यक्षिक करवून घेण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश वाघ यांनी तर आभार प्रदर्शन जितेंद्र कोतवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी योग विभागाचे विद्यार्थी जागृत ठाकरे, अपर्णा मिश्रा, आणि सरला साठे तसेच शाळेचे शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content