पहूर येथील सीटीसर्वे कार्यालयाच्या शिपायाला लाच घेतांना अटक

London Anti Corruption

पहूर, ता जामनेर ( वार्ताहर ) तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी तथा तक्रारदार सुरेश बन्सीलाल भोई यांच्या मयत वडिलांच्या नावे असेलेल्या घराला वारस लावण्याच्या कामासाठी तीन हजारांची लाच घेतांना पहूर येथील परीरक्षण भूमापक कार्यालयातील शिपाई आप्पा बाबुलाल सोनार (वय ४५) याला शुक्रवारी संध्याकाळी रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात आज (शनिवार) पहाटे ५.०० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुरेश बन्सीलाल भोई (रा.पाळधी) यांचे वडील मयत झाले असून यांच्या नावे असलेल्या घराला वारस लावण्यासाठी त्यांनी पहूर येथील परीरक्षण भूमापक कार्यालयात संबंधित लागणारे कागदपत्रे सादर केले होते. या कार्यालयात कार्यरत असलेले शिपाई सोनार (रा.पाचोरा, ह.मु. जामनेर) यांनी हे काम लवकरात लवकर करून देतो, पण यासाठी मला तीन हजार रूपये द्या, अशी मागणी भोई यांच्याकडे केली. भोई यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी शुक्रवारी संध्याकाळी पाळधी येथील नाचनखेडा चौफुलीवर सापळा रचला होता. या ठिकाणी सुरेश भोई यांच्याकडून तीन हजाराची लाच स्विकारताना शिपाई सोनार याला रंगेहाथ पकडले व ताब्यात घेतले. शनिवारी पहाटे ५.०० वाजता पहूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आप्पा सोनार हा सेवा निवृत्त सैनिक असून, नंतर या कार्यालयात नियुक्त झालेला आहे.

Add Comment

Protected Content