जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरातील एका ट्रान्सपोर्टचे कार्यालय फोडून १ लाख ३० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दाणा बाजार परिसरात जनता बँकेच्या पाठीमागे मोहम्मद अन्सार इंद्रीस (वय-३६) यांच्या मालकीचे अजिंठा ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे. शनिवारी ६ एप्रिल रोजी रात्री ११.३० ते रविवावारी रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडले. ट्रान्सपोर्टचे कार्यालय फोडून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आलेली ९० हजार रुपयांची रोकड व पत्री गल्ल्यात ठेवण्यात आलेली ४० हजार रुपयांची चिल्लर अशी एकूण १ लाख ३० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली. सोमवारी ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता हा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी कार्यालयाच्या ठिकाणी पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणी मोहम्मद अन्सार इद्रीस यांच्या फिर्यादीवरुन रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सर्जेराव क्षिरसागर हे करत आहेत.