आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ होणार !

मुंबई प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचा विचार राज्य शासन करत असून ही रक्कम ३ लाखांपर्यंत वाढविण्याचा विचार असल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री वडेट्टीवार यांनी वरील घोषणा केली. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने होत आहेत त्या थांबविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांना देण्यात येणारी मदत कमी असल्याचे मान्य करीत ही मदत चार लाखांपर्यंत वाढवता येईल का याचा विचार सुरू असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

 

जून ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान १०७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे आढळून आली त्यापैकी जिल्हास्तरीय समितीने ४९१ प्रकरणे पात्र ठरविली असून एकूण २१३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले असून ३७२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत तर ४८२ प्रकरणी मदतीचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

सद्यपरिस्थितीत एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या निकषानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना एक लाख रूपयाची रक्कम देण्यात येते. यापैकी ३० हजार रूपयांची रोख रक्कम शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तर ७० हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात ठेवीच्या स्वरूपात ठेवले जातात. आणि त्यावरील व्याज ५०० रूपये महिना शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना महिन्याला मिळते. मात्र ५०० रूपयांची रक्कम आता फारच अल्प असल्याने या एक लाख रूपयांच्या रकमेत वाढ करण्याचा गंभीर विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Protected Content