अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महानुभाव पंथीयांची काशी, रिद्धपुर येथे सुरु झालेल्या देशातील पहिल्या मराठी विद्यापीठात यावर्षीपासूनच अभ्यासक्रम सुरु करण्याचे जोरकस प्रयत्न सुरु झाले आहेत. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर झाला असून प्राध्यापकांची नियुक्ती व प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक या दोन्ही बाबींनासुद्धा अंतिम स्वरुप देण्यात आले आहे.
या विद्यापीठात एम.ए. मराठी आणि आणखी एक पदव्युत्तर पदवी असे दोन अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया येत्या आठवडाभरात पूर्ण केली जाणार असून दोन्ही प्रस्ताव शासनाकडे सादर झाले आहेत. या माहितीला खुद्द कुलगुरु डॉ. अविनाश आवलगावकर यांनी दुजोरा दिला असून ते व्यक्तीश: या बाबींचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्यामते एम.ए. मराठीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत तब्बल २४ विद्यार्थ्यांनी इच्छा प्रकट केली आहे.