मुंबई प्रतिनिधी । क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने गाझियाबाद येथील हिंडन येथे भारतीय हवाई दलाचा आज ८७ वा वर्धापन दिनानिमित्त होणा-या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली. तसेच या कार्यक्रमात हवाई दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
८७ वर्षांपूर्वी १९३२ साली आजच्या दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने गरुडझेप घेतली. आजच्या ८७ व्या वर्धापनदिनानिमित्त गाझियाबादमधील हिंडन येथे हवाई दलाचा एक विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात लष्करप्रमुख बिपीन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया आदी उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, सप्टेंबर २०१० साली सचिनला भारतीय हवाई दलाकडून ग्रुप कॅप्टन हा बहुमान प्रदान करण्यात आला होता. सचिनने आज झालेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून हवाई दलाची विविध कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके पाहिली आणि सगळ्यांचे कौतुकही केले.