आता शिवसेना पदाधिकार्‍यांचे शिंदे गटात इनकमींग

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना आमदारांमध्ये उभी फूट पाडून सत्तारूढ झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पदाधिकार्‍यांवर लक्ष केंद्रीत केले असून मुंबईतील शाखा प्रमुखांनी आता त्यांच्या ग्रुपची वाट धरल्याचे दिसून आले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य ३९ आमदारांनी उध्दव ठाकरे यांची साध सोडली. यानंतर संतोष बांगर हे देखील त्यांच्या सोबत आले. यामुळे आता त्यांच्याकडे ४० शिवसेनेचे तर १० अपक्ष अशा ५० आमदारांचे संख्याबळ आहे. येत्या काही दिवसात त्यांच्याकडे शिवसेनेचे १० पेक्षा जास्त खासदार देखील येणार असल्याचे यात संकेत मिळाले आहेत. काही खासदारांनी तर आधीच याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. यातच आता शिंदे गटाला पदाधिकार्‍यांची देखील साथ लाभणार असल्याचे दिसून येत आहे.

आज एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मागाठणे मतदारसंघातील शाखाप्रमुख आणि शिवसेना पदाधिकार्‍यांनीही राजीनामे स्थानिक विभाग प्रमुखांकडे दिले आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या सोबत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी याच शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेतली होती. त्याच शिवसैनिकांनी राजीनामा सत्र सुरू केलंय. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या आज निघणार्‍या मिरवणुकीत हे सर्व शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी होणार असलेल्याचीही माहिती आहे. याच प्रकारे राज्यभरातील पदाधिकारी हे शिंदे गटात दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content