ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी… कुणाल कामराच्या गाण्यावरून वादंग !

मुंबई- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्हिडीओमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेना गटाची खिल्ली उडवण्यात आली आहे. या प्रकरणावरून शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून, काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.


कुणाल कामराने आपल्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासावर विडंबनात्मक गाणे तयार केले. या गाण्यात शिंदेंचे नाव घेतले नसले तरी ‘गद्दार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, काही कार्यकर्त्यांनी कामराच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तोडफोड केली.

रात्री कुणाल कामराच्या स्टुडिओवर शिवसैनिकांनी हल्ला करत तोडफोड केली. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात राहुल कनाल, कुणाल सरमळकर, अक्षय पनवेलकर यांच्यासह १५-२० शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर भाजपनेही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणावर विनोदाच्या नावाखाली बदनामी केली असून, त्याच्या चेहऱ्यावर काळं फासण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दरम्यान, शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २३ मार्च रोजी कुणाल कामराने खार पश्चिम, मुंबई येथे झालेल्या शोमध्ये शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विडंबनात्मक सादरीकरण केले. त्यातून पक्षाच्या आणि शिंदे यांच्याविषयी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात कुणाल कामराने अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून व्हिडीओ पोस्ट करत, स्टँडअप कॉमेडी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचे सुचवले आहे.

या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. एकीकडे कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसरीकडे त्याच्या समर्थनार्थ काहींनी आवाज उठवला आहे. पुढील काही दिवस या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Protected Content