मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. प्रचंड उकाडा असल्यामुळे मतदानासाठी गेलेल्या नागरिकांना त्याचा फटका बसला. काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी गेलेल्या मतदारांना उन्हामुळे चक्कर आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काहींची प्रकृती बिघडल्याच्याही घटना घडल्या आहेत. अशातच मुंबई येथे मतदान केंद्रावर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात डिलाईल रोड येथील सखुबाई मोहिते मार्गावरील मतदान केंद्र क्रमांक १७५ मध्ये शिवसेनेचे पोलिंग एजंट मनोहर नलगे यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मतदान केंद्रात अस्वस्थ वाटत होते. मतदान संपल्यानंतर ते नलगे शौचालयात गेले आणि तिथेच कोसळले. शौचालयाचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढावे लागले. हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासणीनंतर समजले. वरळीतील डिलाईड रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक २० च्या येथे म्हस्कर उद्यानात ठाकरे गटाचा पोलिंग बूथ होता. येथे मनोहर नलगे कार्यरत होते. तीव्र उन्हामुळे नलगे यांना त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मनोहर नलगे यांना इतरांनी केईएम रुग्णालयात दाखल केलं असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातही शोककळा पसरली आहे.