ठाकरे सरकारने सुरू केला चुना लावायचा कारखाना – निलेश राणे

nilesh rane

मुंबई, वृत्तसंस्था | राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीवरून माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना भरपाई देण्याची या सरकारने घोषणा केली नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीही दिलेली नाही. ठाकरे सरकार इतर कुठला कारखाना काढणार की नाही माहीत नाही. पण या सरकारने पहिल्या दिवसापासूनच चुना लावायचा कारखाना सुरू केला आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

 

निलेश राणे यांनी एक ट्विट करून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. या सरकारकडून अधिवेशन काळात भरपूर अपेक्षा होत्या. अतिवृष्टीमुळे नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना हे सरकार भरपाई देईल असे वाटत होते. पण या सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना एक पैसाही दिला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेबाहेर असताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची वारंवार मागणी करायचे. पहिल्या अधिवेशनात ते सरकसकट कर्जमाफी देतील असे वाटत होते. पण त्यांनी सरसकट कर्जमाफी न देऊन शेतकऱ्यांची चेष्टाच केली आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दोन लाखांच्या कर्जमाफीमध्येही कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

कर्जमाफीत स्पष्टता नाही : फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. या कर्जमाफीतून खासदार, आमदार आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले होते. मात्र या कर्जमाफीवरून विरोधकांनी राज्यसरकारवर जोरदार टीका केली होती. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीत कोणतीही स्पष्टता नसल्याचे विरोधकांनी म्हटले होते. तर शेतकऱ्यांचे दीड लाखांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सातबारा सोडा या सरकारने केवळ पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्याला बगल दिली आहे. अतिवृष्टीमुळे पीडित झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये भरपाई देण्याचे आश्वासनही दिले होते. ही आश्वासने ठाकरे सरकारने पूर्ण करावीत, असा टोलाही फडणवीस यांनी सरकारला लगावला होता.

Protected Content