कोयता घेऊन दहशत; हद्दपार गुन्हेगाराला अटक


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून हद्दपार करण्यात आलेला असतानाही शहरात प्रवेश करून हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. समता नगर परिसरातून ही कारवाई रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष संजय सोनवणे (वय २३, रा. समता नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याच्यावर पोलिसांनी यापूर्वीच हद्दपारीची कारवाई केली होती. असे असतानाही, तो हद्दपारीचे उल्लंघन करून समता नगर परिसरात लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना रविवारी मिळाली.

माहिती मिळताच, पोलीस ठाण्याचे कर्मचारी हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, योगेश बारी आणि रेवानंद साळुंखे यांचे एक विशेष पथक तातडीने कारवाईसाठी रवाना झाले. या पथकाने त्वरित परिसरात शोध घेऊन दहशत माजविणाऱ्या आशिष सोनवणे याला मोठ्या शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून पोलिसांनी एक धारदार लोखंडी कोयता हस्तगत केला आहे.

हद्दपार असूनही शहरात लोखंडी शस्त्र घेऊन दहशत माजविण्याच्या या गंभीर कृत्याबद्दल आशिष सोनवणे याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.