तेलुगू देसम पार्टी एनडीएमध्ये सामील

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तेलुगू देसम पक्ष एनडीएमधून काही वर्षांपूर्वी बाहेर पडला होता, परंतू पुन्हा एकदा भाजपला साथ देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. या पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारीच भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे ही अटकळ बांधलीच जात होती. याशिवाय, अभिनेते पवन कल्याण यांचा जनसेवा पक्षही एनडीएमध्ये सहभागी झाला आहे.

आगामी निवडणूक एकत्रितपणे लढण्याची तयारी तेलुगू देसम पार्टी आणि भाजपने दर्शविली असून जागावाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू आहे, असे तेलुगू देसम पार्टीचे खासदार के. रवींद्रकुमार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. आंध्र प्रदेशात लोकसभेच्या २५ जागा असून विधानसभेचे १७५ मतदारसंघ आहेत. लोकसभा आणि आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए बरोबर आघाडी करण्याच्या दृष्टीनेच चंद्राबाबू नायडू यांनी अमित शहा आणि नड्डा यांची भेट घेतली होती, असेही कुमार यांनी स्पष्ट केले. या भेटीवेळी पवन कल्याण हेदेखील उपस्थित होते. अमित शहा यांच्या निवासस्थानी ७ मार्च रोजी रात्री दीड तास या विषयावर चर्चा झाली. या चर्चेनंतर आघाडी करण्याचा निर्णय झाला असला तरी अद्याप जागावाटपावर एकमत झालेले नाही.

Protected Content