तेजस मोरेचे चॅट जाहीर : पोलिसांना देत होता निर्देश

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पेन ड्राईव्ह बॉंबमधील प्रमुख सूत्रधार असणार्‍या तेजस मोरे याचे व्हाटसऍप चॅट समोर आले असून यात तो आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात पोलिसांना सूचना देत असल्याचे निदर्शनास आले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पेनड्राइव्हने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे भाजपनेत्यांना विविध केसेसमध्ये अडकवण्याचे कथित कारस्थान उघडकीस आणले होते. याप्रकरणी तेजस मोरे आणि तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कथित ऑडिओ क्लिपनंतर पुन्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे.  माजी मंत्री आणि भाजपनेते गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्हा प्रसारक मंडळ प्रकरणातील तपास अधिकारी आणि मोरे यांच्यातील व्हाट्स ऍप चॅट समोर आले असून यावरून झी-२४ तास या वाहिनीने गौप्यस्फोट केला आहे.

या गौप्यस्फोटानुसार जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळ प्रकरणात कोणावर कोठे छापे टाकायचे? पंच कोणाला घ्यायचं? याची माहिती मोरेंनी तपास पोलीस अधिकार्‍यांना पुरवली असल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबत  पोलिसांची राहण्याची जेवण्याची व्यवस्था असलेली ठिकाणे मोरे यांनी पोलिसांना कळवली असल्याचेही  समोर आले आहे. पोलिसांना न्यायालयात या केस संदर्भात जे म्हणणं मांडायचं होत त्याचा ड्राफ्टही मोरे यानेच पोलिसांना दिला होता. असे या वृत्तात म्हटले आहे.

या चॅटमधून तेजस मोरे हा तपास अधिकारी आणि प्रवीण चव्हाण यांच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका करत होता असे दिसून येत आहे. दरम्यान, याच प्रकरणात तेजस मोरे विरोधात प्रवीण चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत गुन्हा लवकर नोंद केला जाणार आहे. यातच आता हा गौप्यस्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

Protected Content