तरुण गायकांच्या प्रतिभेतून रंगली “तेज-गंधर्व” शास्त्रीय संगीत स्पर्धा

लहान गटातून छ. संभाजीनगरची युगंधरा तर मोठ्या गटातून लातूरचा सचिन प्रथम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भीमपलास,  आसावरी, वृंदावन सारंग, यमन,  बागेश्री अशा विविध रागांचा वापर करून छोटाख्याल, बडाख्याल सादर करीत अनेक युवा विद्यार्थ्यांनी दिवंगत तेजस नाईक स्मरणार्थ आयोजित  “तेज-गंधर्व” या स्पर्धेमध्ये रविवारी दि. २९ ऑक्टोबर रोजी रंगत आणली. या स्पर्धेमध्ये लहान गटात छत्रपती संभाजीनगरची युगंधरा केचे हिने  प्रथम तर मोठ्या गटात लातूरचा सचिन जाधव याने प्रथम क्रमांक मिळविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

 

कान्ह ललित कला केंद्रच्या स्वरदा संगीत विभागातर्फे आयोजित दिवंगत तेजस नाईक स्मरणार्थ शास्त्रीय गायन स्पर्धा रविवारी २९ ऑक्टोबर रोजी मु.जे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. उदघाटनावेळी मंचावर केसीई संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य स. ना. भारंबे, तेजसचे वडील नितीन नाईक व आई सुवर्णा नाईक, संगीत विभाग प्रमुख प्रा. कपिल शिंगाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन केले. शास्त्रीय संगीत प्रत्येकांपर्यत पोहोचावे, ते रुजू व्हावे व आत्मसात देखील व्हावे या उद्देशातून स्पर्धा आयोजित होत असते असे प्रस्तावनेतून कपिल शिंगाणे यांनी सांगितले.

 

दिवंगत तेजस नाईकने लहानश्या आयुष्यात शास्त्रीय संगीतावर भरभरून प्रेम केले. त्याची स्मृती कायम राहावी, उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन मिळावे याकरिता स्पर्धा आयोजित केल्याचे तेजसचे वडील नितीन नाईक यांनी सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. भारंबे यांनी, विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रात संधी व प्रोत्साहन मिळाले की पुढे जात राहावे. कलेची आवड जोपासत शास्त्रीय संगीताचा देशाचा वारसा अधिक उज्ज्वल करावा, असे सांगितले. यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध गायक व संगीतकार ज्ञानेश्वर कासार व संगीतकार मनोज कुलकर्णी यांनी केले.

 

स्पर्धेत ८ ते १५ वर्षांचा लहान गट व १६ ते २८ वर्षाचा मोठा गट सहभागी होता. लहान गटासाठी फक्त छोटाख्याल तर मोठ्या गटासाठी बडाख्याल व छोटाख्याल सादर करायचा होता. संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  चांदोरकर प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर, अड. प्रवीणचंद्र जंगले, शशिकांत वडोदकर, प्राचार्य एस.एन. भारंबे उपस्थित होते. शास्त्रीय संगीताची आवड जिवंत ठेऊन विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पुढे जावे, असे प्रतिपादन दीपक चांदोरकर यांनी व्यक्त केले. स्पर्धेत राज्यभरातून लहान गटात १५ तर मोठ्या गटात २२ युवा गायकांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन् गोपीचंद धनगर यांनी करून आभार मानले. स्पर्धेसाठी प्रा. देवेंद्र गुरव, भूषण काटोले, महिमा परदेशी, चेतना पाटकरी, ऋषिकेश तायडे, स्वरांजली पाटील यांच्यासह ईशान नाईक आदींनी परिश्रम घेतले.

 

स्पर्धेचा निकाल :

लहान गट –

प्रथम : युगंधरा गजानन केचे (छ. संभाजीनगर)

द्वितीय : मानस गोपाल पाटील (जळगाव)

तृतीय : संयम गोकुळ खैरनार (मालेगाव)

उत्तेजनार्थ : पवित्र महेश कवडे (नंदुरबार)

 

मोठा गट –

प्रथम : सचिन सूर्यकांत जाधव (लातूर)

द्वितीय : ऋषिकेश अशोक पवार (छ. संभाजीनगर)

तृतीय : मंगेश शंकरराव वाघ (जळगाव)

उत्तेजनार्थ : आदिनाथ शरद धुमाळे (अकोला)

Protected Content