रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तहसीलदार बंडू कापसे यांनी “लोकशाही दिना” निमित्त आयोजित कार्यक्रमात जनतेत जाऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या व संबंधित विभागाला तात्काळ सोडवण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे तालुकाभरातून समस्या घेऊन आलेल्या जनतेला जागेवरच न्याय मिळाला.
रावेर तहसील कार्यालयात आज प्रांतधिकारी बबनराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार बंडू कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, आर. डी. पाटील यांनी लोकशाही दिनाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित जनतेने कृषी, पुरवठा विभाग, व शेती रस्ते संदर्भातील येणाऱ्या समस्या मांडल्या. त्या फटाफट सोडवण्यासाठी वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे आयोजन केंद्र सरकारच्या Good Governance Week – प्रशासन गाव की ओर मोहिमे अंतर्गत करण्यात आले होते. विविध शासकीय योजनांच्या शिबिरांचे आयोजन आज गाव पातळीवर व तालुका स्तरावर करण्यात आले आहे.
आज आयोजित तालुका स्तर लोकशाही दिनासाठी विविध विभागांचे अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गटविकास अधिकारी, न.पा. रावेर आणि सावदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, वैद्यकीय अधिकारी, कृषि अधिकारी, भारत संचार निगम लि., महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग आणि होमगार्ड कार्यालयाचे अधिकारी यांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे जनतेच्या समस्या तात्काळ सोडवल्या जातात आणि प्रशासनाचा लोकांशी अधिक जवळचा संवाद साधला जातो.