बांगलादेशचा धुव्वा उडवत टीम इंडिया विजयी

teem

राजकोट वृत्तसंस्था । कर्णधार रोहित शर्माच्या दमदार खेळीच्या जोरावर टिम इंडियानं राजकोटच्या दुस-या टी-20 सामन्यात बांगलादेशचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. बांगलादेशने या सामन्यात भारतासमोर १५४ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. ७.२ षटकांत बिनबाद ६० धावा करणाऱ्या बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. ठराविक अंतराने बांगलादेशचे फलंदाज बाद होत गेले. भारताच्या फिरकीपटूंनी बांगलादेशच्या डावाला वेसण घातली. त्यामुळे २० षटकांत बांगलादेश ६ बाद १५३ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

भारतापुढे विजयासाठी १५४ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्मा-शिखर धवन जोडीने दमदार सलामी दिली. पहिल्या टी-२० सामन्यात फारशी चमक दाखवू न शकलेल्या रोहितने आज बांगलादेशच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. रोहितने चौफेर फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ नेले. रोहित ८५ धावांची तडाखेबंद खेळी करून बाद झाला. संयमी ३१ धावा करत शिखरने त्याला सुरेख साथ दिली. शिखर आणि रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर (२४) आणि लोकेश राहुलने (८) विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताने १५.४ षटकांत सहजरित्या १५४ धावांचे लक्ष्य पार केले.

राजकोट टी-२० मधील विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दिल्लीत झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला होता. टी-२० त बांगलादेशकडून झालेला भारताचा हा पहिलाच पराभव होता. या पराभवाची सव्याज परतफेड आज भारताने केली. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना नागपुरात विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रविवारी दि. १० नोव्हेंबर रोजी होणार असून या सामन्यात विजयी होणारा संघ मालिकेत बाजी मारणार आहे.

Protected Content