आदीवासी भागात शिक्षक अध्ययन समृद्धी प्रशिक्षण

WhatsApp Image 2019 11 19 at 18.27.18

चोपडा, प्रतिनिधी | शाळेतील प्रत्येक मूल शिकले पाहिजे, त्याने इयत्तानिहाय अध्ययन क्षमता प्राप्त केल्या पाहिजे. यासाठी शिक्षकांना अध्ययन समृद्धीचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता बांधणीचे काम चोपडा तालुक्यातील आदिवासी बीटमध्ये सुरू झाले आहे. या माध्यमातून चोपडा तालुक्यातील आदिवासी भेट हे महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल असा संकल्प या वेळी करण्यात आला आहे.

येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात चोपडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आदिवासी बीटमधील कार्यरत शिक्षकांसाठी बीटस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत भाषा, गणित, इंग्रजी साहित्य पेटीचा वापर विषयक दोन दिवसीय कार्यशाळेत उपस्थित शिक्षक साहित्य पेटीचा प्रात्यक्षिक अनुभव घेत आहेत. शासनातर्फे राज्यातील जिल्हा परिषद शाळांना मानसशास्त्रीय दृष्ट्या तयार केलेल्या भाषा, गणित, इंग्रजी साहित्य पेट्या पुरवण्यात आलेल्या आहेत. या पेट्या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन त्यांच्या अध्ययन क्षमतेला आणि विचार क्षमतेला चालना देणाऱ्या आहेत. या पेट्यांचा प्रभावीपणे वापर केल्यास विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढीस लागून ते इयत्तानिहाय अध्ययन क्षमता प्राप्त करतील, असा विश्वास यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी (आदिवासी बीट) सुमित्र अहिरे यांनी व्यक्त केला. शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभिनव कार्यशाळेचे उद्घाटन महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गांना अध्यापन करणारे ५० शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. तज्ञ मार्गदर्शक उमेश बाविस्कर, दीपक पाटील, रमेश जगताप हे प्रशिक्षण देत आहेत. कार्यशाळेच्या आयोजनासाठी केंद्रप्रमुख वंदना बाविस्कर, मीनाक्षी गाजरे, उत्‍तम चव्‍हाण, अंबादास पाटील यांनी कामकाज पाहिलं. तालुक्‍यात प्रथमच होत असलेल्या या अध्ययन समृद्धी कार्यशाळेस प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, गटविकास अधिकारी भरत कोसोदे यांची प्रेरणा असून गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर गजरे यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. उनपदेव जि. प. शाळेचे उमेश बाविस्कर यांनी या उपक्रमाबाबत सांगितले की, शासनातर्फे पुरविण्यात आलेल्या भाषा, गणित साहित्य पेट्यांमध्ये वापरताना सुसूत्रता यावी. घटक आणि आशय अनुरूप त्या योग्य पद्धतीने वापरता याव्यात, त्यात सहजता असावी आणि तयारीतील वेळ वाचावा यासाठी या साहित्य पेट्यांमधील संच त्यांचे वर्गीकरण केले. साहित्य पेट्यामधील साहित्याचे संच व कृतीची सांगड घातल्याने त्याचा वापर प्रभावी होत असून त्याचा विद्यार्थी आणि शिक्षकांना लाभ होत आहे.

Protected Content