शिक्षक दाम्पत्याने मुलीच्या लग्नात वाचनालयाला भेट दिली ३१ हजारांची पुस्तके

faijpur news 1

फैजपूर, प्रतिनिधी | वाचन संस्कृती विकसित व्हावी व प्रशासकीय सेवेत विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढावी या हेतूने स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाचनालयात उपलब्ध करून देण्याकरिता आपल्या मुलीच्या लग्नाचे निमित्त साधून एका शिक्षक दाम्पत्याने ३१ हजार रुपयांचा धनादेश भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयाला नुकताच प्रदान केला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, भुसावळ येथील दयाराम शिवदास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षक ललितकुमार निळकंठ फिरके व न्हावी ता.यावल येथील भारत विद्यालयातील उपशिक्षिका संगीता फिरके यांची सुकन्या तेजश्री हिचा शुभविवाह किशोर पुरुषोत्तम जावळे यांचे सुपुत्र कुणाल उर्फ कृष्णा यांच्याशी रविवार दि.1 डिसेंबर रोजी गोरज मुहूर्तावर येथे पार पडला. शिक्षक दाम्पत्य असलेल्या दोघांनी आपल्या मुलीच्या लग्नाचे औचित्य साधून वाचनसंस्कृतीला बळ देण्याचे ठरवले आणि त्यानुसार वधू-वरांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयाला ही आर्थिक मदत भेट म्हणून देण्याचे ठरवण्यात आले.

त्यानुसार लग्न सोहळा पार पडत असताना भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर यांना व्यासपीठावर बोलवण्यात आले. श्रीस्वामीनारायण गुरुकुलचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रकाशदासजी स्वामी यांच्या हस्ते श्री.तोडकर यांना ३१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत शास्त्री भक्तीस्वरूपदासजी, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे, प्रा. आर.वाय. पाटील, भरत महाजन, सुनील चौधरी ,वधू चि.सौ.कां. तेजश्री, वर चि.कुणाल उर्फ कृष्णा, नवरदेवाचे वडील किशोर पुरूषोत्तम जावळे, आई सौ.ललिता जावळे, वधूचे वडील ललितकुमार फिरके, आई सौ.संगीता फिरके, आजोबा निळकंठ रामदास फिरके, श्रीमती कुसुम श्रीधर फिरके, डॉ. दिपक पाटील यांच्यासह भाऊबंध, नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार असे हजारो वऱ्हाडी उपस्थित होते.

यावेळी शास्त्री भक्तीप्रकाशदासजी म्हणाले की, अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद काम फिरके दाम्पत्याने केले असून इतरांसाठी आदर्श पायंडा घालून दिला आहे. विद्यार्थी हित जोपासण्याचे काम खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणून या दोघांनी केले असून विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा उपयोग स्पर्धा परीक्षा देण्यासाठी करावा आणि यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी धनादेशाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची नवनवीन पुस्तके वाचनालयात उपलब्ध करून देण्यात येतील आणि विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे सांगितले. यावेळी सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी मानले.

Protected Content