पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हवाई हल्ल्याचा पर्याय?


नवी दिल्ली (वृत्तसेवा) पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्यदलाने नियंत्रण रेषेवर पाकिस्तानावर लष्करी दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. काय घडू शकते याची कल्पना असल्याने पाकिस्तानही पूर्ण अलर्टवर आहे. पुलवामा हल्ल्यात भारताने आपले ४० वीर गमावाल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची भावना आहे. काहीही करुन पाकिस्तानला धडा शिकवाच असाच सर्वत्र सूर आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी नेमकी काय कारवाई करावी यावर सरकार दरबारी विविध पर्यायांवर विचार सुरु आहे.

पाकिस्तानशी पर्णपणे युद्ध छेडणे टाळता यावे यासाठी भारतीय लष्कराकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीमेपलिकडे काही किलोमीटरच्या अंतरापर्यंत हल्ले करता येऊ शकतात. शिवाय, सीमेपलिकडील पाकिस्तानच्या काही लष्करी तळावर ताबाही मिळवता येऊ शकतो. याबरोबरच, नियंत्रण रेषेवर पाकव्याप्त काश्मीरमधील नॉन-स्टेट-अॅक्टर्सवर काही हवाई हल्ले देखील करता येऊ शकतात. यांपैकी मर्यादित हवाई हल्ले हा पर्याय सर्वात व्यावहारी आणि प्रभावी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सप्टेंबर २०१६मध्ये सर्जिकल स्ट्राइककेल्यामुळे आता पुन्हा सर्जिकल स्टाइकचा पर्याय निष्प्रभ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुखोई-३०एमकेआय, मिराज-२००० आणि जॅग्वार या फायटर विमानांद्वारे स्मार्ट बॉम्ब, मिसाइलने शत्रू प्रदेशातील दहशतवादी तळ, लाँच पॅड उडवता येऊ शकतात. पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश न करताही हा हल्ला करता येईल. या प्रकारच्या कारवाईसाठी वेळही खूप कमी लागेल असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. २९० किमी रेंज असलेले सुपरसॉनिक ब्राह्मोस मिसाइल आणि अन्य शस्त्रास्त्राद्वारे पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या, दहशतवादी तळ उडवता येऊ शकतात, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Add Comment

Protected Content