निकिता जेकब यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणातील संशयित अ‍ॅड निकिता जेकब यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन   मिळाला आहे.

 

टूलकिट प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर तसेच दिल्ली पोलीस अटकेसाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर जेकब यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तीन आठवड्यांसाठी निकिता यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

 

टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बंगळुरूतील दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीला रविवारी अटक केली. त्यानंतर अ‍ॅड निकिता जेकब आणि बीड येथील शंतनू मुळूक यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर दिल्ली पोलीसानी  अटकेचे प्रयत्न सुरू केले होते. अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्यानंतर निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

शंतनू यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठात याचिका दाखल केली होती. निकिता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शंतनू यांना काल खंठपीठाने अंतरिम जामीन दिला होता.  निकिता यांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने निकिता जेकब यांना तीन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. त्याचबरोबर या दरम्यान त्यांना अटक झालीच, तर २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांनी याचिकेवर निर्णय दिला.

 

 

थनबर्ग हिचे ‘टूलकिट’ या प्रकरणी अटकेत असलेली पर्यावरणवादी दिशा रवी आणि जेकबसह खलिस्तानी चळवळीत सहभागी असलेल्यांनी तयार केले व समाजमाध्यमावरून ते प्रसारित केले, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला होता. प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर  घडलेला प्रकार हा एकप्रकारे हत्याकांडच होते. त्यात ४०० हून अधिक पोलीस जखमी झाले, असा आरोप करून दिल्ली पोलिसांनी जेकब यांची याचिका फेटाळण्याची मागणी काल झालेल्या सुनावणी दरम्यान केली होती.

Protected Content