तळोदा-बऱ्हाणपुर महामार्ग मार्ग रावेर तालुक्यातूनच जाणार

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर: अंकलेश्वर-बऱ्हाणपुर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय सडक परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने २६ मार्च २०२५ रोजी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. या नव्या अधिसूचनेनुसार, महामार्ग रावेर तालुक्यातूनच जाणार असून, मुक्ताईनगर तालुका वगळण्यात आला आहे. या महामार्गाच्या नव्या मार्गिकेमध्ये रावेर तालुक्यातील भातखेडे, रावेर, कर्जाद, पातोंडी, पुनखेडे, तामसवाडी, खिरवड, वाघोड, मोरगाव खु., मोरगाव बु., अटवाडे, अजनाड, खानापूर आणि चोरवड या १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांतील जमिनींचे अधिग्रहण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी फैजपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे.

यापूर्वीच्या २४ जानेवारी २०२२ आणि ७ नोव्हेंबर २०२३ च्या अधिसूचनेनुसार महामार्ग कोचूर, विवरा, नांदूरखेडा आणि अंतुर्ली मार्गे जाणार होता. मात्र, रावेर तालुका वगळण्यात आल्याने स्थानिकांनी मोठा विरोध केला. महामार्गाला रावेरशी जोडावे, या मागणीसाठी आंदोलने झाली. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी याप्रकरणी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करत रावेर तालुक्याला जोडणारी सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करून घेतली. तळोदा-बुरहानपूर महामार्ग गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमधून जाणार आहे.

त्याची लांबी खालीलप्रमाणे असेल:

गुजरात: ७ किमी
नंदुरबार जिल्हा: ५८ किमी
धुळे जिल्हा: ४८ किमी
जळगाव जिल्हा: १२० किमी
मध्य प्रदेश: १३ किमी

या प्रकल्पासाठी ८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यातील ३ हजार कोटी भूसंपादनासाठी आणि ५ हजार कोटी महामार्गाच्या बांधकामासाठी खर्च होणार आहेत. रावेर तालुका हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या नव्या महामार्गामुळे केळी वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे. महामार्गामुळे व्यापार आणि दळणवळण सुलभ होणार असल्याने स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.

Protected Content