मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना प्रचार करणे सोयीचे व्हावे यासाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुका घेण्यात आल्याचा आरोप झाला असताना, विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी सत्ताधारी महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गटाने केली. ठाकरे गटानेही हाच सूर लावला असला तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने मौन बाळगले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भूमिका जाणून घेतली. त्यावेळी एका टप्प्यात निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी शिंदे गट, अजित पवार गट आणि ठाकरे गट आग्रही राहिले. २०१९ची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यंदाही एकाच टप्प्यात निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात पाच टप्प्यांत मतदान का घेण्यात आले, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई यांनी केला. कोणाच्या सोयीसाठी मतदान एवढे लांबविण्यात आले होते, अशी विचारणाही त्यांनी केली.
विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तसे संकेत दिले होते.मात्र, शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणूक किती टप्प्यांत घ्यावी याबाबत आम्ही भूमिका मांडलेली नाही, असे शरद पवार गटाचे रविंद्र पवार आणि काँग्रेसचे डॉ. गजानन देसाई यांनी सांगितले. बैठकीला शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.