पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानाचा पारोळा शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या अभियानाअंतर्गत नागरिकांना मतदार यादी अद्ययावत ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून, प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत अचूक असल्याची खात्री करावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी केले.
जनजागृती शिबिराचे उद्घाटन पारोळा तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत बी. पाटील, पतंगराव पाटील, रविंद्र पाटील, नगरसेवक विवेक पाटील, दगडू पवार सर, शहर तलाठी निशिकांत माने, विविध बीएलओ, अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावांची दुरुस्ती, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, माहिती भरण्याची प्रक्रिया तसेच BLO आणि ECINET App च्या माध्यमातून मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, बदल करणे आणि माहिती अद्ययावत ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांच्या शंकांचे निरसन करून मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभागाचे महत्त्वही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूक असणे ही सशक्त लोकशाहीची पूर्वअट आहे. कोणताही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येकाने SIR अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा.” त्यांनी नागरिकांना स्वतःची तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांची मतदार नोंदणी तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या तातडीने करून घेण्याचे आवाहनही केले. शिबिरात उपस्थित मान्यवरांनीही मतदार यादी अचूक ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगत लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने या अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन केले. प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून मतदार यादी अधिक अचूक व विश्वासार्ह करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



