Home Cities जळगाव अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर करावाई करा; भाजपचे एसपींना निवेदन

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर करावाई करा; भाजपचे एसपींना निवेदन


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने मंगळवारी २७ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन अमळनेर येथील ‘रऊफ बँड’ संचालक अस्लम अली सय्यद याच्याविरुद्ध तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.

सदर व्यक्तीवर अमळनेर तालुक्यातील धानोरी येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. याप्रकरणी चौफुली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या घटनेत रऊफ बँडच्या वाहनाचा गैरवापर झाल्याचे समोर आले असून, यामुळे वाहतूक व परिवहन नियमांचा भंग झाल्याचा आणि कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

या निवेदनात भाजपने काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यानुसार, रऊफ बँडचे संबंधित वाहन तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस तपासात समाविष्ट करावे. तसेच, आरोपी अस्लम अली आणि त्याच्या सहकाऱ्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स (CDR) तपासून संपूर्ण माहिती उघड करावी. या प्रकरणासंबंधी संपूर्ण पथकाची बारकाईने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही भाजपने केली आहे.

ही घटना समाजात भीती व अस्वस्थता पसरवणारी असून, यामुळे भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध होण्यासाठी प्रशासनाने त्वरित कठोर पावले उचलावी, अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीने व्यक्त केली आहे. यावेळी भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, प्रदेश युवा उपाध्यक्ष भैरवी वाघ-पलांडे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा भारतीताई सोनवणे, प्रदेश चिटणीस रेखाताई वर्मा, माजी नगरसेविका सुरेखा तायडे, भाग्यश्री चौधरी, सरोज पाठक, मनोज भांडारकर, गजानन, धीरज वर्मा यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound